इस्लामाबाद – दिवसेंदिवस वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी पाकिस्तान सरकारची झोप उडवली आहे. बलात्कारी विकृती ठेचण्यासाठी अनेक देशात वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. पाकिस्ताननेही याची गंभीर दखल घेत बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आरोपीवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कायमची अद्दल घडेल अशी शिक्षा देण्यासाठी पाकिस्तानात नवीन कायदा आणण्यात येत आहे.
बलात्कारातील आरोपींना औषध देऊन नपुंसक बनवलं जाणार आहे. या कायद्याचा हेतू बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर निकाल लावून दोषींना कठोर शिक्षा देणं आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय बनली आहे. संसदेद्वारे बनवण्यात येणाऱ्या या कायद्यात दोषींना रासायनिक औषधांद्वारे नपुंसक बनवण्याच्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. या शिक्षेतून दोषींच्या मनात कायमची दहशत निर्माण होईल असं पाकिस्तान सरकारला वाटत आहे.
देशातील महिला आणि लहान मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी हा कायदा आणला आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पाकिस्तानी मंत्रिमंडळाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यानं त्याचे विधेयक आता पारित झालं आहे. या कायद्यानुसार दोषींना सहमतीने केमिकल्सद्वारे नपुंसक बनवण्याची आणि बलात्काराच्या घटनेतील खटले तातडीने विशेष न्यायालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी तरतूद केली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, गुन्हे कायदा विधेयक २०२१ यात बुधवारी संसदेच्या दोन्ही सत्रात दुरुस्ती करण्यात आली. या कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान दंड संहिता, १८६० आणि दंड प्रक्रिया संहिता १८९८ मध्ये संशोधन करण्यात आले आहे. कायद्यानुसार दोषीला रासायनिक पद्धतीने नपुंसक बनवण्याची प्रक्रिया पार पडेल. ज्यामुळे भविष्यात त्याला कधीही लैंगिक सुख घेता येणार नाही. विशेष म्हणजे बलात्कारासारख्या गुन्ह्याविरोधात बनवण्यात आलेल्या या कायद्याला पाकिस्तानात विरोधही होत आहे. पाकिस्तान जमात ए इस्लामीचे खासदार मुश्ताक अहमद यांनी या कायद्याला विरोध केला आहे. त्याला गैर इस्लामी आणि शरियाच्याविरोधात असल्याचा दावा केला आहे. बलात्कारातील दोषीला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात यावी. शरियात कुठेही नपुंसक बनवण्याचा उल्लेख नसल्याचं त्यांचे म्हणणं आहे.