वाहतुकीचे नियम मोडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत तुम्ही ऐकलं असेल, कधी कधी स्वत:ही याचा अनुभव घेतला असेल. मात्र कधी पादचाऱ्यांवर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्यात आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? पण दुबईमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याने अनेक पादचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
दुबई हे शहर जेवढं तिथल्या झगमगाटासाठी, उच्च जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. तितकेच इथले नियमही कठोर आहेत. येथील सक्त कायद्यांबाबत बाहेरील लोकांना नेहमीच अप्रूप वाटतं. दुबईमधील वाहतुकीच्या नियमांशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. दुबईमध्ेय वाहन चालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनाही वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. एका वृत्तानुसार दुबईमधील पोलिसांनी धोकादायक पद्धतीने रस्ता पार केल्याप्रकरणी आणि ट्रॅफिक सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ३७ पादचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांना ४०० यूएई दिऱ्हम एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.
या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दुबईमधील वाहतुकीच्या नियमांनुसार परवानगी नसलेल्या ठिकाणांहून रस्ता पार केल्यास किंवा ट्रॅफिक सिग्न मोडल्यास ४०० दिऱ्हम इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दुबईमधील कायद्यात परवानगी नसलेल्या ठिकाणावरून रस्ता ओलांल्यास सक्त कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे.