बीजिंग : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी चीनमध्ये एक अनोखी उपाययोजना करण्यात आली आहे. एका दारुड्या माणसाच्या शरीरात पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेद्वारे चिप बसविण्यात आली. दारूचे व्यसन रोखण्यासाठी उपयोगात आणला जाणारा नाल्ट्रेस्कॉन हा घटक त्या चिपच्या माध्यमातून शरीरात सोडण्यात येतो व त्याद्वारे मेंदूतील रिसेप्टरना लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे एखाद्याच्या मनात दारू पिण्याची निर्माण झालेली इच्छा नाल्ट्रेस्कॉनच्या परिणामामुळे नाहीशी होते व माणूस व्यसनापासून दूर राहतो.
चीनमध्ये दारूचे व्यसन सोडविण्यासाठी लियू या ३६ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात शस्त्रक्रियेद्वारे चिप बसविण्यात आली आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालेला तो त्या देशातील पहिला व्यक्ती ठरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष हाओ वेई यांच्या देखरेखीखाली हुनान ब्रेन हॉस्पिटलमध्ये १२ एप्रिलला पाच मिनिटांत ही शस्त्रक्रिया पार पडली. दारूचे व्यसन सोडविण्यासाठी चिपचा करण्यात येणारा वापर हा क्लिनिकल चाचण्यांचा एक भाग आहे. (वृत्तसंस्था)
या प्रयोगांतून असे आढळले की, दारू पिण्याची सतत होणारी इच्छा हळूहळू कमी झाली. आता दारूचे व्यसन पूर्णपणे सुटेल असा त्याला विश्वास वाटत आहे. जगात दारूमुळे सर्वाधिक मृत्यू चीनमध्ये होतात असे दी लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे.
नेमके काय केले?हुनान प्रांतातील रहिवासी असलेला लियू याला गेल्या १५ वर्षांपासून दारूचे व्यसन जडले आहे. तो दररोज किमान अर्धा लिटर दारू पित असे. त्यानंतर तो हिंसक व्हायचा. तो कामाच्या ठिकाणी तसेच रात्रीदेखील दारू प्यायचा. त्याची ही वाईट सवय सोडविण्यासाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले; पण त्यांना
काही यश येत नव्हते. त्याच्या व्यसनामुळे घरच्या मंडळींना खूप मनस्ताप सोसावा लागत होता. मात्र, त्याचे व्यसन एका चिपच्या माध्यमातून सोडविता येईल अशी आशा निर्माण झाली. त्यासंदर्भातील प्रयोगांच्या चाचणीमध्ये सहभागी होण्यास लियू तयार झाला. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या शरीरात एक विशिष्ट चिप बसविण्यात आली.