पंतप्रधान नरेंद्र मोदीरशिया दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवले होते. त्यानुसार दोन्ही नेते आज मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील २२व्या वार्षिक शिखर परिषदेत भेटतील. या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, आता या आधीच भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियन सैन्यात भारतीय नागरिकांचाही सहभाग आहे. यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. आता रशियन सैन्यातील भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत.
"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या एका खाजगी डिनरच्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य केले आणि रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ४ जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेपूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याकडे हा मुद्दा मांडला होता.
३० ते ४० नागरिक रशियन लष्करात
युक्रेनविरुद्धच्या रशियाच्या युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर युद्धक्षेत्रात अडकलेल्या अनेकांचा दावा आहे की, त्यांना युद्धात सामील करण्यासाठी फसवले. अजूनही ३० ते ४० भारतीयांना रशियन लष्करात काम करण्यास भाग पाडले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी मॉस्कोला पोहोचले. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी आज पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून मॉस्कोमध्ये होणाऱ्या 22व्या भारत-रशिया शिखर परिषदेतही ते सहभागी होणार आहेत.