मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:01 PM2022-03-29T19:01:37+5:302022-03-29T19:02:59+5:30
रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे.
इस्तंबुल-
रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी बैठक होऊ शकते. याआधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये याबाबतची चर्चा होणार आहे.
रशियाने कीव्ह आणि चेर्निहाइव्हमधील लष्करी हालचाली कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कीव्हच्या पत्रकारांनी युक्रेनियन सुरक्षेची हमी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची मागणी केली आहे, अशी माहिती व्लादिमीर मेडिन्स्की यांनी दिली. युक्रेनच्या वाटाघाटी करणार्या संघाचे सदस्य डेव्हिड अराहमिया यांनी या चर्चेला आपला पहिला विजय म्हटलं आहे. त्यांनी इस्तंबूलमधील चर्चेबाबत माहिती देताना आमचा पहिला विजय म्हणजे रशिया-युक्रेन चर्चा बेलारूसमधून तुर्कस्तानला हलवणं. आम्ही तुर्कीकडे युक्रेनची सुरक्षा हमी म्हणून पाहतो, असं म्हटलं आहे.
यूके, चीन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, कॅनडा, इटली, पोलंड आणि इस्रायल या चर्चेच्या परिणामी युक्रेनसाठी सुरक्षा हमीदार बनू शकतात. ते आंतरराष्ट्रीय करारानुसार काम करतील. जे युक्रेनच्या मागणीनुसार नो फ्लाय झोन तयार करण्यास सक्षम आहेत. पण, सुरक्षा हमीदारांची सध्याची कार्यप्रणाली काही उपयोगी ठरताना दिसत नाही. मारियुपोल आणि खार्किवमध्ये याची प्रचिती आली आहे.
कीव्ह आणि चेर्निहाइव्ह येथील हल्ले कमी होणार
इस्तंबूलमधील चर्चेने काही सकारात्मक आशा निर्माण केल्या आहेत. आता दोन्ही देश युद्ध संपवण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतात. रशियाचे उप संरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी सांगितले की, परस्पर विश्वास वाढवण्यासाठी आणि पुढील चर्चेसाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आम्ही कीव आणि चेर्निहाइव्हच्या दिशेने लष्करी हालचालींमध्ये आमूलाग्र कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे, आज डेन्मार्कच्या संसदेला वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी संबोधित केलं. मारियोपोलमध्ये रशियाचा हल्ला हा युद्ध गुन्हा आहे. रशियाने मानवतेविरुद्ध गुन्हा केला आहे, असं जेलेन्स्की यांनी म्हटलं. 24 फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आजही रशियाकडून युक्रेनच्या काही भागात हल्ले केले जात आहेत.