Putin Backs India as Global Superpower: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने अमेरिकेला नक्कीच मोठा धक्का बसू शकतो. 'भारताची अर्थव्यवस्था सध्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने वाढत असल्याने जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र आहे,' असे पुतिन म्हणाले. ते सोची येथील 'वाल्डाई डिस्कशन क्लब'च्या एका सत्राला संबोधित करत होते.
पुतिन पुढे म्हणाले की, 'संपूर्ण जगाने पाहावे की, भारतीय सैन्यात विविध प्रकारची रशियन शस्त्रे आहेत. भारत आणि रशियाचे विश्वासाचे संबधं आहेत. आम्ही भारताला आमची शस्त्रे विकतच नाही, तर ती सोबत मिळून तयारदेखील करतो. द्विपक्षीय संबंधांमध्ये दोन्ही देशांचा एकमेकांवर गाढ विश्वास आहे. भारताची 1.5 अब्ज लोकसंख्या, जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान वाढ, प्राचीन संस्कृती आणि भविष्यात विकासाची चांगली शक्यता, यामुळे महासत्तांच्या यादीत निःसंशयपणे भारताने सामील व्हावे.'
संरक्षण क्षेत्रात रशिया भारताकडे कसा पाहतो?भारत महान देश असल्याचे वर्णन करताना पुतिन म्हणाले, 'आम्ही भारतासोबत सर्व दिशांनी संबंध विकसित करत आहोत. भारत हा एक महान देश आहे. भारत आर्थिक प्रगतीत जगात अग्रेसर आहे. आमचे सहकार्य दरवर्षी अनेक पटींनी वाढत आहे. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि रशिया यांच्यात संपर्क विकसित होत आहे.' पुतिन यांनी उदाहरण म्हणून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र प्रकल्पाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'आम्ही ते (क्षेपणास्त्र) हवा, समुद्र आणि जमीन या तीन वातावरणात वापरण्यायोग्य बनवले आहे. हे प्रकल्प भारताच्या सुरक्षेसाठी सुरू आहेत. भविष्यात आमचे संबंध आणखी वाढत राहू,' अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.