मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. भेटीनंतर उभय नेत्यांनी एकमेकांना रायफल भेट दिली. पुतीन यांनी किम जोंग यांना अंतराळात परिधान करण्यात येणारे हातमोजेही भेट दिले. अंतराळ मोहिमेदरम्यान एका रशियन अंतराळवीराने ते परिधान केले होते, अशी माहिती क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. किम यांनी उ. कोरियात बनवण्यात आलेल्या अनेक वस्तू पुतीन यांना भेट दिल्या.
जुनेच मित्र चांगलेकिम जोंग उन यांना भेटल्यानंतर पुतीन म्हणाले, दोन नवीन मित्रांपेक्षा जुना मित्र चांगला असतो. खरे तर सोव्हिएत युनियन आणि उत्तर कोरिया यांच्यात कोरियन युद्धापासून चांगले संबंध आहेत.
पुतीन २३ वर्षांनंतर उत्तर कोरियाला भेट देणार - हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुतीन यांना उत्तर कोरिया भेटीचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले आहे. पुतीन यांनी २००० मध्ये उ. कोरियाला भेट दिली होती. - तेव्हा त्यांनी किम जोंग उन यांचे आजारी वडील किम जोंग इल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पुतीन यावर्षी उत्तर कोरियाला गेले, तर २३ वर्षांनंतर त्यांची उत्तर कोरियाची ही पहिली भेट असेल.