नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धाची मोठ्या प्रमाणावर झळ बसलेल्या रशियाने लोकसंख्या वाढविण्यासाठी महिलांना अजब ऑफर दिली आहे. दहा अपत्ये जन्माला घाला आणि १० लाख रशियन रुबलचे बक्षीस मिळवा, असे पुतीन सरकारने जाहीर केले आहे.
२०२० पासून रशियातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्या देशात आजवर लाखो नागरिकांना यात मृत्यू झाला. त्या मागोमाग युक्रेनच्या युद्धातही रशियाचे ५० हजारांवर सैनिक मृत्युमुखी पडले. या दोन्ही कारणांमुळे रशियाच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्या वाढविण्यासाठी रशियाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
देशात लोकसंख्येचे संतुलन बिघडले असले तरी सरकारने सुचविलेल्या या उपाययोजनेवर टीकेची झोड उठवली जात आहे. ज्यांची कुटुंबे मोठी असतात, ते जास्त देशाभिमानी असतात, असे पुतीन सातत्याने म्हणत आले आहेत. लोकसंख्यावाढीसाठी सरकारचा हा निर्णय विचार करून घ्यायला हवा होता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
कधी मिळणार बक्षीस?रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांनी देशातील महिलांना याबाबत आवाहन केले आहे. महिलांनी १० अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी महिलांना बक्षीसही जाहीर केले आहे. महिलांनी १० किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म दिल्यास आणि सर्व अपत्ये जिवंत राहिल्यास दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी संबंधित महिलेला १० लाख रशियन रुबल (सुमारे १३ लाख रुपये) बक्षीस दिले जाणार आहे.
१० अपत्ये कोण वाढवणार? रशियन राजकारणी व सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी म्हटले आहे की, दहा अपत्यांना जन्म घालण्याचा रशियाचा काळ मदर हिरॉइन म्हणून ओळखला जातो. देशात १९९० पासून याबाबत प्रयत्न सुरू आहेत. १० लाख रुबल्स मिळविण्यासाठी १० अपत्ये वाढविण्यास कोण तयार होणार, हाही खरा प्रश्न आहे. रशियात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्याही खूप आहे.