रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपणार? पुतीन समर्थकानं केली अजब भविष्यवाणी, कोण जिंकणार तेही सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:16 PM2023-04-03T16:16:58+5:302023-04-03T16:17:27+5:30
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
मॉक्सो-
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. यात पुतीन प्रेमी एका भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीनं लवकरच युद्ध संपणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्य आपली पूर्ण ताकदीचं दर्शन घडवेल आणि लवकरच विजय प्राप्त करेल असं तिनं म्हटलं आहे. एलिसिया आर्टेमयेवा असं भविष्यवाणी करणाऱ्या पुतीन समर्थकाचं नाव आहे. युक्रेन विरुद्धचा संघर्ष सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं तिनं म्हटलं आहे. रशियन सैन्य आता पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. येत्या तीन आठवड्यात युक्रेनचं समर्थन करणारे पाश्चिमात्य देश खडबडून जागे होतील. रशिया हे युद्ध जिंकणार आहे, असं तिचं म्हणणं आहे.
"युद्ध आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत युक्रेनला कळून चुकेल की ते आता पराभूत झाले आहेत. त्यांच्याकडे रशियन सैन्याविरुद्ध लढण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. हळूहळू त्यांची उर्जा आणि जोश कमी होत आहे. तर रशियन सैन्य दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या रशियाची सीमा युक्रेनच्या दिशेनं वाढेल", अशी भविष्यवाणी एलिसिया हिनं केली आहे.
संघर्ष आता मिटण्याच्या दिशेने
'युक्रेन आता रशियाचं वर्चस्व नाकारू शकणार नाही', असं एलिसिया म्हणाली. mk.ru च्या अहवालानुसार, एप्रिलच्या मध्यात रशिया युक्रेनच्या अनेक भागांवर कब्जा करण्यास सुरवात करेल. हा संपूर्ण संघर्ष आता तोडगा काढण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं ती म्हणाली. पाश्चिमात्य लोकांना आता हे समजू लागलं आहे की रशियन लोकांच्या वाकड्यात कधी जाऊ नये. हे भाकीत अशा वेळी होत आहे, जेव्हा रशियाचे अध्यक्ष अण्वस्त्रांनी पाश्चात्य देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रशियन अण्वस्त्रे बेलारूसमध्ये तैनात
बेलारूसमधील रशियाच्या राजदूताने रविवारी सांगितले की त्यांचा देश बेलारूसच्या सीमेवर उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) च्या सदस्य राष्ट्रांसह अण्वस्त्रे तैनात करेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शेजारी आणि मित्र राष्ट्रांच्या हद्दीत सामरिक अण्वस्त्रे तैनात करण्याबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर राजदूत बोरिस ग्रिझलोव्ह यांनी हे वक्तव्य केले आहे. विश्लेषकांच्या मते, ही घोषणा म्हणजे अण्वस्त्रांचा धोका दाखवून पाश्चात्य देशांना युक्रेनला पाठिंबा देण्यापासून परावृत्त करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे.