Russia-Ukraine War: हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:53 PM2022-04-28T13:53:37+5:302022-04-28T13:54:05+5:30
युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे.
मॉक्सो-
युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. युद्धात हस्तक्षेप करणाऱ्या देशांवर तात्काळ हल्ला करण्याची संपूर्ण तयारी रशियाची आहे, असं रोखठोक विधान पुतीन यांनी केलं आहे. पुतीन यांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रशियानं अमेरिकेला युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिमी देशांकडून युक्रेनला केला जाणारा शस्त्र पुरवठा युद्धाची धग आणखी वाढविण्याचं काम करत आहेत. बुधवारी सेंट पीट्सबर्गमध्ये खासदारांना संबोधित करताना पुतीन यांनी पश्चिमेकडील देशांचा रशियाचे तुकडे करण्याचा मनसुबा असल्याचं म्हटलं. पश्चिमेकडील देशांनी युक्रेनला युद्धाच्या संकटात टाकल्याचा आरोपही पुतीन यांनी यावेळी केला.
पुतीन म्हणाले आम्ही शस्त्रांनी सुसज्ज!
युक्रेन विरुद्धच्या आमच्या युद्धात जर कुणीही हस्तक्षेप करत असेल आणि रशियाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करु इच्छित असेल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असं पुतीन म्हणाले. असं करणाऱ्या देशांना प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्यासाठी आमच्याकडे सर्व शस्त्र सज्ज आहेत. आम्ही अहंकारी अजिबात नाही पण गरज पडल्यास आम्ही शस्त्रांचा वापरही करू, असंही पुतीन म्हणाले.
युक्रेन विरोधात रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युद्ध पुकारलं. दोन महिन्यांनंतर रशियानं युक्रेनच्या काही शहरांवर ताबा मिळवला आहे. तर अनेक शहरं बेचिराख करुन टाकली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडलं आहे. युक्रेनविरोधातील कारवाईला रशियानं विशेष कारवाई असं म्हटलं आहे. तर युक्रेन आणि पश्चिमेकडील देशांनी यास विनाकारण युद्ध करण्याचं खोटा बहाणा असल्याचं ठरवलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन गुरुवारी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात निवेदन जारी करणार आहेत.