मॉस्को: भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदीचा प्रस्ताव देणाऱ्या रशियानं युरोपियन युनियनला जोरदार झटका दिला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाला जवळपास महिना होत आला असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मैत्रीपूर्ण संबंध नसलेल्या देशांना आता रशिया रूबलच्या बदल्यात नैसर्गिक वायूची विक्री करणार आहे. या देशांमध्ये युरोपियन युनियनचा भाग असलेल्या सर्व देशांचा समावेश आहे. युनियनमध्ये २७ देशांचा समावेश होतो.
रशियाविरोधात उभ्या असलेल्या देशांना नैसर्गिक वायूची विक्री करताना डॉलर आणि युरोमध्ये व्यवहार होणार नाही. केवळ रूबलमध्येच व्यवहार केले जातील, असा निर्णय रशियन सरकारनं घेतला आहे. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाच्या परदेशातील मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. अनेक युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानं युरोपियन देशांना दणका दिला आहे.
युरोपला लागणाऱ्या एकूण नैसर्गिक वायूपैकी ४० टक्के वायू एकट्या रशियाकडून येतो. युरोपियन युनियन रशियाकडून नैसर्गिक वायूची आयात करते. रशिया आणि युनियन यांच्यात होणारा दैनंदिन व्यवहार २०० मिलियन ते ८०० मिलियन युरोच्या घरात जातो. आता हा संपूर्ण व्यवहार रूबलमध्ये केला जाणार आहे. याचा परिणाम चलन विनिमयावर होऊ शकतो. रशियाच्या निर्णयानंतर ब्रिटनसह युरोपियन देशांमध्ये नैसर्गिक वायूचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.