रशियातील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत व्लादिमिर पुतीन यांचा पाचव्यांदा विजय झाला आहे. जवळपास ८८ टक्के मते पुतीन यांना मिळाली आहेत. गेल्या महिन्यात आर्कटिक जेलमध्ये विरोधी पक्षनेते नवेलिनी यांचा रहस्यमयी मृत्यू झाल्याने पुतीन यांना कोणीच विरोधक राहिला नव्हता. यामुळे पुतीन बिनदिक्कत निवडून आले आहेत.
नवेलिनी यांच्या मृत्यूबाबत पुतीन बोलले आहेत. नवेलिनी यांच्याशी संबंधित कैद्यांच्या अदलाबदलीला मी सहमती दिली होती. नवेलिनी यांचा मृत्यू दु:खद घटना आहे. परंतु, तुरुंगात नवेलिनी यांच्याबरोबरच अन्य कैद्यांच्याही मृत्यूची प्रकरणे आहेत, असे पुतीन म्हणाले. अशा गोष्टी होत राहतात, तुम्ही याला काही करू शकत नाही, हे जगण्याचा हिस्सा आहेत, असे पुतीन म्हणाले.
निवडणुकीने रशियाच्या एकतेला आणखी मजबूत केले आहे. रशियासमोर अनेक कामे आहेत. पाश्चिमात्य देशांविरोधातील लढा सुरु असल्याने आव्हाने आहेत. आम्हाला कोणी घाबरवू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न करुदेत, आमची इच्छाशक्ती, चेतना दाबण्याचा प्रयत्न करूदेत. इतिहासात ना कोणी आजवर असे करू शकला, ना आता, ना भविष्यात करू शकणार असे पुतीन म्हणाले.
याचबरोबर रशिया आणि नाटोमध्ये संघर्ष झाला तर जग तिसऱ्या महायुद्धापासून एक पाऊल दूर असेल असा इशाराही पुतीन यांनी दिला. अशी परिस्थिती यावी असा विचार करणारा कदाचित एखादाच असेल असेही पुतीन म्हणाले. युक्रेनमध्ये अणुबॉम्बची गरज लागेल असे मला वाटत नाही, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले.