वॉशिंग्टन : ‘आपण यापूर्वी कधीही नव्हतो इतक्या तिसऱ्या जागतिक आण्विक महायुद्धाच्या तोंडावर आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांनी माझी भेट घ्यावी आणि या भयंकर युद्धावर तोडगा काढावा’, असे आवाहन अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांना केले आहे. हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प म्हणाले, ‘या युद्धावर तोडगा काढण्यासाठी मी दोघांशीही चर्चा करेन. बायडेन यांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरुद्ध वापर करण्याची परवानगी दिली तर तिसरे आण्विक महायुद्ध सुरू होईल. बायडेन याबाबत अकार्यक्षम आहेत म्हणून हा नरसंहार मलाच थांबवावा लागेल, असा दावाही ट्रम्प यांनी केला.
ज्युनिअर ट्रम्प म्हणतात, यंदा प्रशासन जागरूक
डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव ज्युनिअर ट्रम्प यांनी प्रशासनातील बदलांवर भाष्य केले आहे. हे बदल करणारे लोक याबाबत जागरूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ कसे निवडायचे आणि प्रशासन भक्कम कसे करायचे, हे या लोकांना चांगले ज्ञात असल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांचा इम्रान यांच्याशी संबंध नाही : साजिद तरार
- अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी काहीही संबंध नाही, असे मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती साजिद तरार यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील ‘मुस्लिम फॉर ट्रम्प’ संघटनेचे साजिद प्रमुख आहेत. ट्रम्प आगामी काळात भारताशी असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करतील, असे त्यांनी नमूद केले. ब्रेंडन कार प्रसारण आयोगाचे अध्यक्ष
- अमेरिकेच्या प्रसारण-दूरसंचार आणि ब्रॉडबँड आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रेंडन कार यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यापूर्वी कार यांनी आयोगाचे वकील म्हणून काम केले आहे.