मास्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन सीमेवरील लष्करी कारवाया बंद करण्याचे व सैन्य माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर युक्रेनने पूर्व भागातील सैन्य तातडीने काढून घ्यावे, असे आवाहन केले आहे. सैन्याचे वसंत कालातील प्रशिक्षण आता संपले आहे. त्यामुळे रोस्तोव्ह, बेलगोरोड, ब्रायन्स्क प्रांतातील सैन्य आता मागे घ्यावे असे पुतीन यांनी सांगितले. हे तीनही प्रांत युक्रेनच्या सीमेला जोडून आहेत व रशियाचे सैन्य मार्चपासून येथे तैनात केले आहे. हे ७० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर असल्याने युक्रेन व पाश्चिमात्य देश तणावात होते. रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करेल, अशी भीती होती. हे सैन्य आपल्या सीमेंतर्गत असून लष्करी कवायतींचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असा रशियाचा दावा होता. युक्रेनने पूर्व भागात ठाण मांडून बसलेल्या रशिया समर्थक बंडखोरांवर लष्करी कारवाई सुरू केली असून, त्याला रशियाचा विरोध आहे. या भागातील हिंसाचार बंद करावा व सैन्य मागे घ्यावे, असे आवाहन पुतीन यांनी केले आहे. युक्रेनच्या नेत्यांनी शनिवारी या बंडखोरांशी वाटाघाटींची दुसरी फेरी केली. या वाटाघाटीत युक्रेनचे व रशियासमर्थक राजकीय नेते सहभागी झाले; पण बंडखोरांचा सहभाग नव्हता. २५ मे रोजी युक्रेनमध्ये निवडणूक आहे. (वृत्तसंस्था)
युक्रेन सीमेवरील सैन्य मागे घेण्याचे पुतीन यांचे आदेश
By admin | Published: May 20, 2014 12:12 AM