रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे त्यांच्या मग्रूर स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. पुतिन यांना जे नेते आवडत नाहीत, त्यांना भेट घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ते वाट पाहायला लावतात. पुतिन यांनी चर्चेसाठी वाट पाहायला लावलेल्या नेत्यांची यादी तशी मोठी आहे. मात्र आता व्लादिमीर पुतीन यांनी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना चर्चेसाठी सुमारे दीड तास वाट पाहायला लावल्याचं समोर आलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील शस्त्रसंधीबाबत दूरध्वनीवरून चर्चा करण्यासाठी पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना बराच काळ वाट पाहायला लावल्याचे सांगण्यात येत आहे.
पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोनवर वाट पाहायला लावल्याच्या दाव्याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. दरम्यान, त्यातील एका व्हिडीओमध्ये व्लादिमीर पुतीन हे एका बिझनेस कॉन्फ्रन्समध्ये असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान, अलेक्झँडर शोखिन हे त्यांना डोनाल्ड ट्रप्प यांच्यासोबत बोलायचं असल्याची आठवण करून देतात. त्यानंतर व्लादिमीर पतिन हसून सांगतात की त्यांचं ऐकू नका. त्यावर शोखिन म्हणतात की, आता डोनाल्ड ट्र्प काय म्हणतात हे आपल्याला पाहावं लागेल. त्यावर स्पष्टीकरण देत व्लादिमीर पुतिन सांगतात की, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलत नव्हतो, तर मी रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्याबाबत बोलत होतो.
द सनच्या रिपोर्टनुसार व्लादिमीर पुतिन हे संध्याकाळी पाच वाजता क्रेमलिन येथे पोहोचले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन येण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेळेच्या एक तास उशिराने पुतिन तिथे पोहोचले होते. मात्र त्यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे नव्वद मिनिटे चर्चा झाली होते.