Python Attack Women : इंडोनेशियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सुलावेसीच्या लुवू रीजेंसीमध्ये एका 30 फूट लांब अजगराने महिलेला जिवंत गिळले. ही दुःखद घटना मंगळवारी(दि.2) घडली. आपल्या आजारी मुलाचे औषध घेण्यासाठी महिला घराबाहेर पडली अन् अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती सापडली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सिरीयती(30) नावाची महिला आपल्या मुलाचे औषध घेण्यासाठी घराबाहेर पडली. जंगलातून जात असताना तिच्यावर अजगराने झडप घातली आणि तिला जिवंत गिळले. बराचवेळ पत्नी घरी न परतल्यामुळे पती आदिंस्या तिच्या शोधासाठी घराबाहेर पडला. यावेळी त्याला जंगलात 30 फूट लांब अजगराच्या तोंडात पत्नीचा पाय आढळला. हे दृष्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
पत्नीला वाचवण्यासाठी आदिंस्याने सापाला मारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सिरीयतीचे पूर्ण शरीर अजगराच्या पोटात गेल्यामुळे तिचा तात्काळ मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अजगराच्या पोटातून महिलेचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. विशेष म्हणजे, दक्षिण सुलावेसीमध्ये एका महिन्यात दुसरी घटना आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला एका 45 वर्षीय महिलेला अजगराने जिवंत गिळले होते.
दरम्यान, इंडोनेशियामध्ये अजगराच्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यात बर्मीज आणि रेटिक्युलेटेड अजगराचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी आढळलेल्या ग्रीन ॲनाकोंडाची दुसरी प्रजाती सापडेपर्यंत रेटिक्युलेटेड अजगराला जगातील सर्वात लांब साप मानले जायचे.