Qin Gang Spy America China : जूनपासून चीनमध्ये बेपत्ता असलेले माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त उघड झाले आहे. त्यांचा करण्यात आलेला छळ (टॉर्चर) हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे समजते. चीनच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हा दावा केला आहे. चीनची हेरगिरी करत असल्यामुळे किन यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावाही केला जात आहे. अमेरिकेतील राजदूत असताना त्यांच्यावर एका टीव्ही पत्रकारासोबत अफेअर असल्याचा आरोपही झाला होता. किनच्या हेरगिरीबाबत रशियानेही चीनला इशारा दिला होता, असा दावा अमेरिकन मासिकाने केला आहे.
चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांची जुलैमध्ये त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांचा शोध लागला नव्हता. आता रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, किन गँग या जगात नाहीत. बीजिंगमधील लष्करी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. याच हॉस्पिटलमध्ये देशातील आघाडीचे नेते उपचार घेतात.
अमेरिकेतील टीव्ही पत्रकारांशी संबंध?
चीनचे परराष्ट्र मंत्री बनण्यापूर्वी किन गँग हे अमेरिकेत राजदूत होते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, त्यांचे अमेरिकेतील एका टीव्ही पत्रकारासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्धही चौकशी सुरू होती. किन गँगवर चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप असल्याने हा तपास सुरू करण्यात आला होता. ते तपासात सहकार्य करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
कोण आहे ती पत्रकार?
राजकीय तज्ज्ञांचा असा दावा आहे की, गेल्या काही काळापासून ४० वर्षीय चिनी अँकर फू झियाओटियन सोबतच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांना खूप नुकसान झाले. फू झियाओटियनने केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ती फिनिक्स टेलिव्हिजन कार्यक्रम टॉक विथ वर्ल्ड लीडर्सची होस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. ती चीनमधील सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अँकर मानली जाते. तिने अनेक जागतिक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. गेल्या वर्षी क्विनच्या टॉक विथ वर्ल्ड लीडर्स या शोसाठी तिच्या मुलाखतीनंतर फू आणि क्विनचे नाते कथितपणे सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर ती अनेक वेळा क्विन गँगसोबत दिसली. मात्र गँग यांच्या प्रकरणापासून फू झियाओटियन देखील बऱ्याच काळ दिसलेली नाही असे सांगितले जात आहे.
अमेरिकेत एका मुलाचा जन्म
अमेरिकेत चीनचा राजदूत म्हणून काम करत असताना त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली होती आणि खुद्द चीनची कम्युनिस्ट पार्टी त्यांची चौकशी करत होती, असा दावा केला जात आहे. अमेरिकेत किन गँगच्या पोस्टींगदरम्यान तिथे एका मुलाचा जन्मही झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्याचा त्याच्या अफेअरशी संबंध असल्याचे बोलले जात होते. ही माहिती समोर आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. विशेष म्हणजे किन यांचे अफेअर आणि अमेरिकेत मुलाचा जन्म झाल्याची माहिती समोर आली तोपर्यंत ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.