Quad Summit 2022: भारताला खिंडीत गाठल्यानंतर जपानचे पंतप्रधान मदतीला धावले, दिलं सडेतोड उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:53 PM2022-05-24T20:53:58+5:302022-05-24T20:54:33+5:30
Quad Summit 2022: जपानमध्ये झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत रशिया-युक्रेनचा मुद्दा प्रमुख होता. भारत वगळता इतर सर्व सदस्य देशांनी (यूएसए, जपान आणि ऑस्ट्रेलिया) रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे
Quad Summit 2022: जपानमध्ये झालेल्या क्वाड देशांच्या बैठकीत रशिया-युक्रेनचा मुद्दा प्रमुख होता. भारत वगळता इतर सर्व सदस्य देशांनी (यूएसए, जपान आणि ऑस्ट्रेलिया) रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आहेत. पण भारताने आजवर ना रशियन आक्रमणावर टीका केली आहे ना रशियाशी व्यापारी संबंध तोडले आहेत. शांततापूर्ण मार्गाने या समस्येवर राजनैतिक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी भारत आग्रही आहे. भारताच्या या भूमिकेबाबत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फुमियो किशिदा यांनी सडेतोड उत्तरं दिली आणि भारताची बाजू मांडली.
क्वाड नेत्यांच्या बैठकीनंतरच्या समारोपाच्या बैठकीत किशिदा यांना विचारण्यात आलं की, भारताच्या रशियाबाबतच्या भूमिकेचा क्वॉडवर काय परिणाम होईल? त्यावर किशिदा यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिलं. "आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाची स्वतःची ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. समविचारी देशांसोबतही असं होऊ शकतं की ते कोणत्याही एका गोष्टीबाबत एकमेकांशी पूर्णपणे सहमत नसतात. असं होणं नैसर्गिक आहे. पण एक संघटना म्हणून क्वाड देशांमधील परस्पर समज आणि सहकार्य वाढवणे महत्त्वाचं ठरेल", असं किशिदा म्हणाले.
युक्रेनमधील परिस्थितीबाबत क्वाडमधील सदस्य देश एका गोष्टीशी नक्कीच सहमत आहेत की कायद्याचं राज्य आणि प्रादेशिक अखंडतेचं महत्त्व राखलं गेलं पाहिजे, असंही किशिदा म्हणाले. युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करताना जपानच्या पंतप्रधानांनी महत्वाचं विधान केलं. टोकियोमध्ये क्वाड नेत्यांच्या बैठकीनं संपूर्ण जगाला एक शक्तिशाली संदेश मिळाला आहे की आम्ही या समस्येसाठी वचनबद्ध आहोत, असं ते म्हणाले.
"युक्रेनवरील रशियन आक्रमण ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया हादरवून टाकणारी घटना आहे," असे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या सहभागामुळे आम्ही टोकियोमधून जगाला वचनबद्धतेचा एक शक्तिशाली संदेश पाठवू शकलो आहोत, असंही ते म्हणाले.
क्वाड देशांच्या या चौथ्या बैठकीत कोविड महामारी, आरोग्य, हवामान बदल, सायबर, अवकाश यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आपल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या आव्हानांना न जुमानता क्वाडची व्याप्ती कशाप्रकारे वाढली आहे यावर प्रकाश टाकला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह सदस्य देशांचा परस्पर विश्वास आणि दृढनिश्चय लोकशाही शक्तींना नवी ऊर्जा आणि उत्साह देत असल्याचेही ते म्हणाले.