जगभरातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. प्रगत देश देखील कोरोनापुढे हतबल झाले असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत आहे. कोरोना काळात आकडेवारी, कोरोनाचे नियम, लसीकरण आणि इतर सुचना याबाबत सातत्याने माहिती देण्यात येते. अनेक देशांनी याबाबत माहिती आणि महत्त्वाचे अपडेट्स देण्यासाठी ट्विटरचा वापर केला आहे. आरोग्य मंत्रालय याबाबत माहिती देत असतं. पण याच दरम्यान एका देशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कॅनडामधील क्युबेक प्रांतात आरोग्य मंत्रालयाने एक मोठी चूक केली आहे. कोविड पोर्टलची लिंक पोस्ट करताना चुकून मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली आहे. पॉर्न हबची लिंक पोस्ट झाल्याने एकच खळबळ उडाली होती. जवळपास 40 मिनिटे ही लिंक ट्विटरवर होती. ही बाब लक्षात येताच मंत्रालयाकडून ट्विट डिलिट करण्यात आले असून या प्रकरणी माफीही मागण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अशी पोस्ट झाल्यानंतर अचानक युजर्स वाढले.
आरोग्य मंत्रालयाने "आमच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती होती, ट्विटर अकाऊंटवर अयोग्य कंटेन्टची अशी लिंक पोस्ट झाली. यामागच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व" असं म्हणत माफीही मागितली आहे. पॉर्नहबची लिंक पोस्ट झाल्याने आरोग्य मंत्रालयावर अनेकांनी टीकेची झोड उठवत नाराजी व्यक्त केली आहे. पण सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.