लंडन : आतषबाजीसह बंदुकीच्या फैरी झाडून ब्रिटनने गुरुवारी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी देश आणि राष्ट्रकुलची आधारशिला अशा शब्दांत महाराणींचा गौरव करत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराणींचे वारस प्रिन्स चार्लस् यांनी आपल्या आईसाठी एक संदेश ध्वनिमुद्रित केला. या संदेशात त्यांनी प्रख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या हेन्री ८ मधील एका संपादित उताऱ्याचे वाचन केले. कॅमेरून यांनी आपल्या संदेशात म्हटले की, महाराणी आमच्या जगातील काही अद्भुत अशा क्षणांत आमच्यासोबत आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धापासून १९६६ मध्ये इंग्लंडने वर्ल्डकप जिंकेपर्यंत किंवा त्यानंतर तीन वर्षांनी चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडेपर्यंतच्या अनेक घडामोडींच्या महाराणी साक्षीदार आहेत. संस्कृतीत स्थित्यंतरे झाली. राजकारणानेही अनेक चढ-उतार पाहिले. तथापि, महाराणी देशासाठी नेहमीच प्रेरणादायी व सामर्थ्यशाली आधारशिला राहिल्या. संसदेत महाराणींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व कॅमेरून करणार आहेत. (वृत्तसंस्था)
महाराणी एलिझाबेथ यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात
By admin | Published: April 22, 2016 3:13 AM