ऑस्ट्रेलियातील पोलीस एक भारतीय व्यक्तीच्या शोधात आहेत. ऑस्ट्रेलियात 24 वर्षीय तरुणीची हत्या केल्यानंतर तेथून पळून गेलेल्या भारतीय व्यक्तीचा ऑस्ट्रेलियन पोलीस सक्रियपणे शोध घेत आहेत. इतकंच नाही तर पोलिसांनी आता आरोपीला शोधून देणाऱ्याला किंवा त्याबद्दल माहिती सांगणाऱ्याला 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर (5 कोटींहून अधिक) बक्षीस जाहीर केले आहे. बक्षीस जाहीर झाल्यानंतर आरोपींचा शोध घेणे सोपे होईल, असे पोलिसांना वाटते.
दरम्यान, या हत्येची घटना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये घडली आहे. 24 वर्षीय टोयाह कॉर्डिंगले ही 2018 मध्ये क्वीन्सलँड बीचवर तिच्या कुत्र्याला फिरवत होती. यादरम्यान राजविंदर सिंग नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेला चार वर्षे उलटून गेली तरी ऑस्ट्रेलियन पोलिसांना आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी आरोपींवर मोठे बक्षीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी राजविंदर सिंग किंवा त्याचा ठावठिकाणाविषयी माहिती मिळाल्यावर नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे क्वीन्सलँड पोलिसांना माहिती देण्याची विनंती केली आहे. तसेच, पोलिसांनी असेही म्हटले आहे की जर ऑस्ट्रेलियातील कोणत्याही व्यक्तीला आरोपीबद्दल माहिती मिळाली तर ते थेट 1800-333-000 वर कॉल करू शकतात.
ज्या कोणाला राजविंदर सिंगबद्दल माहिती असेल तो क्वीन्सलँड पोलिसांशी संपर्क साधेल, असेही पोलिसांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 38 वर्षीय राजविंदर क्वीन्सलँडमध्ये मेल नर्स म्हणून काम करत होता. टोयाह कॉर्डिंगलेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी तो ऑस्ट्रेलियातून पळून गेला. पळून जाताना त्याने पत्नी आणि तीन मुलांचा विचारही केला नाही, त्यांना ऑस्ट्रेलियात सोडून गेला.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर 22 ऑक्टोबर रोजी राजविंदर सिडनीला गेला आणि तेथून विमानाने भारतात पोहोचला. भारतात तो पोहचल्याची पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. राजविंदर हा पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बुट्टर कलानचा रहिवासी आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यासोबतच भावनिक आवाहन केले आहे. दरम्यान,ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी 1 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.