ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 17 - तीन वर्षापूर्वी मलेशियाहून चीनला जाताना गायब झालेले एमएच 370 विमान आता जागतिक विमान वाहतुकीच्या इतिहासात रहस्य बनून राहण्याची शक्यता आहे. अब्जावधी डॉलर खर्च करून आणि संपूर्ण हिंदी महासागर पालथा घालूनही या विमानाचा शोध न लागल्याने या विमानाचे शोध अभियान आज अधिकृत रित्या थांबवण्यात आले.
ऑस्ट्रेलियातील जॉइन्ट एजन्सी को आँर्डिनेशन सेंटरच्या नेतृत्वाखाली एमएच 370 चा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू होती. या शोधमोहिमेवर सुमारे 160 मिलियन अमेरिकन डॉलर एवढा खर्च करण्यात आला होता. या शोधमोहिमेदरम्यान हिंदी महासागरातील 1 लाख 20 हजार चौरस मीटर एवढ्या क्षेत्रात विमानाचा शोध घेण्यात आला. पण या शोधमोहिमेदरम्यान विमानासंबंधी कुठलीही वस्तू हाती लागली नाही.
"आमच्याकडे उपलब्ध असलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची मदत घेतल्यानंतरही विमानाचा शोध घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळेच या विमानाचा समुद्र तळाला शोध घेण्याचे काम आम्ही थांबवत आहोत," असे एमएच 370 चा शोध घेत असलेल्या एजन्सीने म्हटले आहे.
दरम्यान, या दुर्घनेची चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांनी एक नवा भाग दाखवून त्या भागात विमानाचा शोध घेण्याची शिफारस केली होती. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. सर्च झोन संपल्यानंतर या विमानाचा शोध थांबवण्याबाबत ऑस्ट्रेलिया, चीन आणि मलेशियामध्ये गतवर्षी सहमती झाली होती. त्यामुळे सर्च झोन संपल्यानंतर आता या विमानाचा शोध थांबवण्यात आला आहे. 8 मार्च 2014 रोजी मलेशियातून चीनला जाताना हे विमान रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. आता कुणी देणगीदाराने मदत केल्यास किंवा मलेशिया सरकारने नव्याने फंडाची तरतूद केल्यास विमानाचे शोधकार्य नव्याने सुरू होऊ शकते, पण सध्यातही हे कठीणच दिसत असल्याने एमएच 370 एक रहस्य बनून राहण्याची चिन्हे आहेत.