वॉशिंग्टन- एखादा लहानसा प्राणी संपूर्ण देशाचे फक्त लक्षच वेधून घेऊ शकतो असे नाही तर सर्व देशाचा जीव टांगणीला लावू शकतो याचा प्रत्यय अमेरिकन नागरिकांना नुकताच आला. रॅकून या लहानशा प्राण्याने मिनिसोटा राज्यातील एका उंच इमारतीवर चढाई करायला सुरुवात केली आणि हा रॅकून आता वरुन पडेल याची भीती सगळ्या अमेरिकेला वाटू लागली. त्याला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच अवधीनंतर त्याला उतरवण्यात यश आल्या नंतर सगळ्या अमेरिकेचा अडकलेला जीव मोकळा झाला.
रॅकून हा मांजराहून थोड्या मोठ्या आकाराचा प्राणी असतो. एका रॅकूनने मिनिसोटा राज्यातील सेंट पॉल शहरातील यूबीएस प्लाझाच्या उंच भिंतीवर अचानक चढाई सुरु केली. थोड्याचवेळात हा संपूर्ण अमेरिकेत हा चर्चेचा विषय झाला. इंचा-इंचाने पुढे सरकणाऱ्या या रॅकूनमुळे अमेरिकन लोकांनी हातातली कामं टाकून टीव्ही, रेडिओ, ट्वीटरसमोर ठाण मांडले. ट्वीटरवर त्याच्या नावाने हॅशटॅगही सुरु झाला. रॅकूनचे प्राण वाचवावेत यासाठी धावा सुरु झाला तर काही लोकांनी त्याला कसे वाचवावे याचे उपायही सुचवले. पण रॅकून मात्र एकेक पाऊल वर सरकतच राहिला.