वॉर्सा : पोलंडची राजधानी वॉर्सा येथे एका भारतीय व्यक्तीला विद्वेषी वागणूक देऊन त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला आहे. तुम्ही आमच्या वंशाचा नरसंहार करत आहात असे एक जण भारतीयवंशीय व्यक्तीला सुनावताना या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेबाबत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
टेक्सास येथे चार भारतीयवंशीय महिलांचा तसेच कॅलिफोर्निया येथे एका भारतीय व्यक्तीला वर्णद्वेषी वृत्तीतून त्रास देण्यात आला होता. त्यानंतर पोलंडची घटना उजेडात आली आहे. पोलंडमधील व्हिडिओ वॉर्सा शहरातील ऑट्रियम रेडुटा शॉपिंग सेंटरच्या बाहेर चित्रित करण्यात आल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. तिथे एका अमेरिकी व्यक्तीने भारतीयवंशीय गृहस्थाचा अवमान केला. या प्रसंगाच्या चित्रीकरणाला त्या भारतीयवंशीयाने विरोध केला नाही. वंशद्वेषी अमेरिकी व्यक्तीने त्याचा काही मिनिटे पाठलाग केला. या व्हिडिओतील भारतीयवंशीयाची तसेच त्याचा अवमान करणाऱ्या अमेरिकी व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
अवमान करणारा गोईम टीव्हीचा संस्थापक?भारतीयवंशीय व्यक्तीचा अपमान करणारा व्यक्ती गोईम टीव्हीचा संस्थापक जॉन मिनाडीओ असावा अशी शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलंडमध्ये अनेक युरोपीय नागरिक स्वत:ची ओळख अमेरिकी नागरिक अशी करून देतात. मिनाडिओने तसाच बहाणा केला असावा असा दावा करण्यात येत आहे. गोईम टीव्हीवरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रम वादग्रस्त स्वरूपाचे असतात.