पॅरिस - राफेल विमान करारावरून झालेला वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे. राफेल विमान करारासाठी भारत सरकारनेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते. भारत सरकारकडून एकच नाव आल्याने देसॉ एव्हिएशनकडे अन्य पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्वा ओलांद यांनी केला आहे.फ्रान्समधील एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमधून ओलांद यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच राफेल करारासाठी रिलायन्सची निवड करण्यामध्ये देसॉ एव्हिएशनचा कोणताही हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ओलांद यांनी सांगितले की, भारत सरकारने ज्या कंपनीचे नाव दिले त्या कंपनीसोबत देसॉने चर्चा केली. देसॉने अनिल अंबानी यांच्याशी संपर्क साधला. आमच्याकडे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. आम्हाला जे नाव देण्यात आले ते आम्ही स्वीकारले." ओलांद यांच्या या गौप्यस्फोटामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याआधी देसॉ एव्हिएशन आणि रिलायन्स यांच्यात झालेला करार हा दोन खाजगी कंपन्यातील करार असून, त्यात सरकारची कुठलीही भूमिका नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. मात्र ओलांद यांच्या गौप्यस्फोटामुळे केंद्र सरकारपचा दावा खोटा ठरला आहे.