पॅरिस : फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे. दसॉल्ट यांच्या अपघाती मृत्यूमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी शोक व्यक्त केला आहे. दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचे देखील सदस्य होते. (Billionaire French politician Olivier Dassault, of Rafale fame, dies in helicopter crash)
ओलिवियर दसॉल्ट हे फ्रान्सचे बडे उद्योगपती होते. अब्जावधींच्या संपत्तीचे मालक असलेलेले सर्ज दसॉल्ट यांचे ते सर्वात मोठे पूत्र होते. ओलिवियर यांचा 69 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. राजनैतिक कारणे आणि हितांमुळे त्यांनी दसॉल्ट बोर्डामधून आपलसे नाव मागे घेतले होते. 2020 च्या फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत दसॉल्ट यांना त्यांचे दोन भाऊ आणि बहीणीसोबत 361 वे स्थान मिळाले होते.
दसॉल्ट यांचे हे खासही हेलिकॉप्टर होते. रविवारी ते नॉर्मंडीमध्ये अपघातग्रस्त झाले. दसॉल्ट यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मॅक्रो म्हणाले की, ओलिवियर दसॉल्ट फ्रान्सवर प्रेम करायचे. त्यांनी उद्योग, नेता, हवाई दलाचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्यांचे असे अचानक जाणे एकप्रकारचे मोठे नुकसान आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्ठांच्या दु:खात मी सहभागी आहे.
दसॉल्टशी भारताचा काय संबंध? भारताला सर्वाधिक चपळ आणि खतरनाक असे जे लढाऊ विमान राफेल मिळालेले आहे, ते दसॉल्ट एव्हीएशनने बनविलेले आहे. ही कंपनी ओलिवियर दसॉल्ट यांची आहे. त्यांच्या वडीलांनी ही कंपनी स्थापन केली होती. ओलिवियर दसॉल्ट यांना कंपनीच्या हितासाठी संचालक पदावरून बाजुला व्हावे लागले होते. दसॉल्ट ग्रुपची ही एक उपकंपनी आहे जी व्यावसायिक विमानांसोबतच लढाऊ विमाने आणि लष्करी युद्धमसामुग्रीचे निर्माण करते.
भारतीय हवाई दलाच्या गोल्डन ॲरोज तुकडीत (स्क्वॉड्रन) १६ ओम्नी रोल राफेल जेट लढाऊ विमाने येत्या एप्रिलमध्ये दाखल झाल्यावर दलाच्या मारक क्षमतेला बळ मिळेल. याशिवाय फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन निर्माती सॅफ्रॅन लढाऊ विमानांची इंजिने आणि दुय्यम भाग भारतात बनवण्यास तयार आहे. पाच राफेल जेट विमाने गेल्या २९ जुलै रोजी अबुधाबीमार्गे अंबाला हवाई तळावर आली आणि ती भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रन १७ मध्ये सामावून घेण्यात आली आहेत. तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी पाच नोव्हेंबर रोजी अंबालात दाखल झाली.