पॅरिस : लवकरच फ्रान्समधून राफेल विमान भारतात आणले जाणार आहेत. तत्पूर्वी भारतीय वायुसेनेचे व्हाईस चीफ एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया यांनी गुरुवारी राफेल विमानातून भरारी घेतली. यावेळी राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले की, 'राफेल विमान भारतासाठी युद्धपातळीवर मोलाचे ठरेल. वायुसेनेत सुखोईसोबत राफेल विमान तणावाच्या परिस्थितीत शस्त्रूंवर हल्ला करण्यास पुरेशे आहे.'
याचबरोबर, राकेश कुमार सिंह भदौरिया म्हणाले, 'राफेल विमानातून उड्डाण केल्यानंतर चांगला अनुभव मिळाला. याठिकाणी खूप काही शिकायला मिळाले असून वायुसेनेच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्यानंतर त्याचा वापर योग्यरित्या करण्यात येईल. याशिवाय, आमच्या वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई-30 सोबत राफेलचाही उपयोग होईल. या दोन विमानांनी एकत्र ऑपरेशन सुरु केल्यास पाकिस्तानला चांगलाच धक्का बसेल.'
राफेल विमानात ज्याप्रकारे तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. ते पाहिले असता वायुसेनेसाठी एकप्रकारे गेमचेंजर ठरु शकणारे आहे. आम्ही ज्या पद्धतीने ऑपरेशन आणि आगामी युद्धासाठी योजना आखत आहोत, यासाठी नक्कीच राफेल उपयुक्त आहे, असेही राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले.