बीजिंग : चीनमध्ये मोर्चे-निदर्शने हा प्रकार फार दुर्मीळ असतो, परंतु कडक कोविड लॉकडाऊनला विरोध म्हणून रविवारी देशभरात ठिकठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. रविवारी सुमारे ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. चिनी सोशल मीडिया आणि ट्विटरवर सरकारच्या सार्वजनिक निषेधाचे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. शांघायमध्येही जोरदार निदर्शने झाली. नागरिकांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनेक आंदोलकांना अटक केल्याची माहिती आहे. विविध विद्यापीठांच्या कॅम्पसमधील निषेधाचे व्हिडीओदेखील प्रसिद्ध झाले आहेत.
शेकडो रहिवासी सरकारी कार्यालयांबाहेर ‘लोकांची सेवा करा आणि लॉकडाऊन संपवा’ अशा घोषणा देत, राष्ट्रगीत गाताना दिसले. हे फुटेजनंतर सेन्सॉर केले गेले. इतर क्लिपमध्ये रहिवासी आणि रस्त्यावर हॅझमॅट सूट घातलेल्या लोकांमध्ये भांडणे दिसली. बीजिंगमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनविरोधी निदर्शने झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी निर्बंध मागे घेतले. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ३९ हजार ५०१ कोरोना रुग्णांपैकी ३५ हजार ८५८ मध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. (वृत्तसंस्था)
उरुमकी येथील लॉकडाऊन मागेशिनजियांगची प्रांतीय राजधानी उरुमकी येथे लॉकडाऊन लागू करण्यापासून सरकारने माघार घेतली, जेथे कोविड लॉकडाऊन अंतर्गत असलेल्या अपार्टमेंट ब्लॉकमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत दहाजण ठार झाले आणि नऊजण जखमी झाले होतेे. उरुमकीत शनिवारी चिनी नागरिकांनी उईगुर मुस्लिमांसह निदर्शने केली. हाँगकाँग येथील साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही निदर्शने पाहता शहरात टप्प्याटप्प्याने कोरोना निर्बंध हटविले जातील, असे उरुमकी अधिकाऱ्यांनी सांगितले.