लंडन: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची लवकरच इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचं नाव आघाडीवर आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. त्यामुळेच गव्हर्नरपदासाठी राजन यांच्या नावाचा विचार केला जात आहे. 325 वर्षांपूर्वी स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड अतिशय प्रतिष्ठित मानली जाते. या बँकेचं गव्हर्नरपद लवकरच रिक्त होणार आहे. इंग्लंडसमोर सध्या ब्रेक्झिटमुळे मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेले राजन या परिस्थितीतून मार्ग काढू शकतात, अशी चर्चा अर्थ वर्तुळात आहे. सध्या राजन शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. राजन यांच्याकडे जागतिक पातळीवरील अनेक संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. राजन यांनी 2003 ते 2006 या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलं. त्यावेळी त्यांनी जागतिक मंदीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर जगभरात मंदी आली. त्यामध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्ससारख्या अनेक महत्त्वाच्या बँका बुडाल्या. राजन यांचं जागतिक मंदीबद्दलचं भाकीत खरं ठरलं होतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर त्यांनी भारत सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं. 2010 ते 2013 या काळात ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. बुडित खात्यात गेलेल्या कर्जांमुळे अडचणीत सापडलेल्या बँकांसमोरील अडचणी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
रघुराम राजन होणार बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 5:15 PM