Rahul Gandhi America: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. राहुल गांधींच्या भाषणावेळी काही लोकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले. यावेळी खलिस्तानची मागणी करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
अमेरिकास्थित खलिस्तानी संघटना SFJ ने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. तो म्हणाले की, 1984 च्या शीख दंगलीत आम्ही काय केले, हे सर्वांनी पाहिलंय? राहुल गांधी अमेरिकेत कुठेही जातील. खलिस्तान समर्थक शीख तुमच्यासमोर उभे राहतील. 22 जूनला मोदींची बारी असेल.
राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर
राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. येथे त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले. या ठिकाणी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही राहुल संवाद साधणार आहेत. राहुल गांधी वॉशिंग्टन डीसीमध्ये संसद सदस्य आणि थिंक टँक यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यांच्या दौऱ्याची सांगता 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये जाहीर सभेने होणार आहे. हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.
राहुल गांधींचा पीएम मोदींवर निशाणा
राहुल गांधी यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले, नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी आहे. बेरोजगारी, महागाई, द्वेष, शैक्षणिक संस्थांचा अभाव या विषयांवर भाजपला चर्चा करायची नाही. त्यामुळेच हे सर्व मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजप आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असा आरोपही राहुल यांनी केला.