Rahul Gandhi : "द्वेषाच्या बाजारात, प्रेमाचं दुकान..."; अमेरिकेत राहुल गांधींना थांबवावं लागलं भाषण, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:45 AM2023-05-31T10:45:02+5:302023-05-31T10:54:01+5:30
Rahul Gandhi : राहुल यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते अमेरिकेतील तीन शहरांच्या दौऱ्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले, तेथे भारतीय समाजातील महिलांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधला. राहुल यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. भाषणादरम्यान काही लोकांनी घोषणाबाजी केल्याने त्यांना काही आपलं काळ भाषण थांबवावं लागलं.
राहुल सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित करत होते. यावेळी काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरू केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या घोषणा दिल्या हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत नसले तरी एक व्यक्ती 'इंदिरा गांधी...' म्हणताना ऐकू येत आहे. घोषणाबाजी सुरू असल्यामुळे राहुल गांधींना आपले भाषण थांबवावे लागले. जेव्हा मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरू झाली तेव्हा राहुल गांधी म्हणाले, "द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान..." यानंतर सभागृहात ‘भारत जोडो’च्या घोषणा द्यायला लोकांनी सुरुवात केली आणि राहुल गांधी पुन्हा बोलू लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"ब्रह्मांडात काय चाललंय? हे मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतात"
राहुल गांधी म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. एजन्सी वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतात राजकारण करणं आता सोपं राहिलेलं नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही प्रवास करण्याचं ठरवलं."
"मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही" असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.