नवी दिल्ली - राहुल गांधी हे त्याचे आजोबा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे आहेत. ते जवाहरलाल नेहरूंसारखे समाजवादी आहेत असं कौतुक पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी केले आहे. फवाद यांनी त्यांच्या सोशल मिडिया X अकाऊंटवर राहुल गांधींचं कौतुक केले आहे.
फवाद चौधरी यांनी म्हटलंय की, राहुल गांधींमध्ये त्यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू यांचासारखा समाजवादी गुण आहे. फाळणीच्या ७५ वर्षानंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सारखीच आहे. राहुल गांधींचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या भाषणाचा उल्लेख केला. ३०-५० कुटुंबाकडे भारताच्या एकूण संपत्तीचा ७० टक्के हिस्सा आहे. अशीच अवस्था पाकिस्तानात आहे. जिथे केवळ बिझनेस कौन्सिल नावाच्या बिझनेस क्लब आणि काही रिअल इस्टेटकडे पाकिस्तानच्या संपत्तीचा ७५ टक्के हिस्सा आहे असं त्यांनी सांगितले.
पाकिस्ताननं राहुलचं कौतुक करताच भाजपानं घेरलं
फवाद हुसैन चौधरी यांनी याआधी राहुल गांधींच्या भाषणाची क्लिप शेअर करत त्यावर राहुल ऑन फायर असा उल्लेख केला. या क्लिपमध्ये राहुल गांधी भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना दिसतात. राहुल गांधींच्या व्हिडिओवर पाकिस्तानी नेत्याच्या प्रतिक्रियेनंतर भाजपा नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी स्क्रिनशॉट शेअर करत पाकिस्तानसोबत काँग्रेसची आघाडी याहून अधिक स्पष्ट असू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, एक पाकिस्तानी नेता, ज्याने भारताविरोधात संधी मिळताच कायम गरळ ओकली, तो राहुल गांधी आणि काँग्रेसला चालना देतोय. याआधी हाफीद सईद यांनी काँग्रेस त्यांचा आवडता पक्ष आहे. पीएम मोदींना हटवण्यासाठी मणिशंकर अय्यर पाकिस्तानला गेले होते. अलीकडेच काँग्रेस नेत्यांद्वारे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले. त्यानंतर बीके हरिप्रसाद उघडपणे पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे आले. वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बचाव केला. काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ हे नाते स्पष्ट आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केला आहे.