ट्रक ड्रायव्हरचा पगार ऐकून राहुल गांधी थक्क झाले; US मध्ये कर्मचाऱ्यांना किती मिळते सॅलरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 03:53 PM2023-06-13T15:53:31+5:302023-06-13T15:53:57+5:30
५ प्रोफेशनलची सॅलरी अमेरिकेत आणि भारतात किती आहे?, जाणून घ्या
काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेत एका ट्रक ड्रायव्हरची सॅलरी ऐकून हैराण झाले. हा ट्रक ड्रायव्हर महिन्याला ४-५ लाख रुपये कमावतो. खरेच अमेरिकेत ड्रायव्हरला इतकी सॅलरी मिळते? तर याचे उत्तर आहे होय, अमेरिकेत एका ट्रक ड्रायव्हरला महिन्याला ५ लाख रुपये सहज मिळतात. भलेही तुम्हाला भारताच्या ट्रक ड्रायव्हर तुलनेत ही सॅलरी जास्त वाटत असेल. परंतु अमेरिकेत भारताच्या तुलनेत प्रत्येक कुशल कामगाराची सॅलरी १० पटीने अधिक आहे. मग ते टीचर, ड्रायव्हर, बँकर, आर्मी किंवा डिलीव्हरी बॉय असो.
जाणून घेऊया, पुढील ५ प्रोफेशनलची सॅलरी अमेरिकेत आणि भारतात किती आहे?
१) शिक्षक
सर्वात आधी शिक्षकांची सॅलरी बघूया, अमेरिकेत २०२२-२३ या वर्षात एका शिक्षकाची सॅलरी सरासरी वार्षिक ६८,४६९ डॉलर्स म्हणजे ५६ लाख ४१ हजार २०८ रुपये आहे. मासिक पाहिले तर भारतीय चलनात एका शिक्षकाला महिन्याला ४ लाख रुपये पगार मिळतो. शहराच्या हिशोबाने अमेरिकेत वेगवेगळी सॅलरी स्ट्रक्चर आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियात सर्वाधिक ९०,१५१ डॉलर्स सॅलरी आहे तर फ्लोरिडात सर्वात कमी ५२,३६२ डॉलर्स सॅलरी आहे.
भारतात प्राथमिक शिक्षकाची सॅलरी सरासरी २५ हजार रुपये महिना आहे. तर माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचा पगार वार्षिक ५ लाख रुपये आहे. अनुभवानुसार सॅलरीत वाढ होत राहते. १० वर्ष जुन्या शिक्षकाला महिन्याला ८० हजार रुपये पगार दिला जातो. भारताच्या तुलनेत अमेरिकेत शिक्षकांची सॅलरी १० पटीने जास्त आहे.
२) ड्रायव्हर
जर अमेरिका आणि भारतातील ड्रायव्हरची सॅलरी तुलना केली तर तुम्ही हैराण व्हाल. काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रक ड्रायव्हरचा पगार ऐकून थक्क झाले. सध्या राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी वॉश्गिंटन ते न्यूयॉर्क १९० किमी प्रवास राहुल गांधींनी ट्रकाने केला. यावेळी राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हर तेजिंदर गिल यांना विचारले की, महिन्याला किती कमावता? त्यावर ड्रायव्हरने ४-५ लाख रुपये सांगितले. जर ट्रक स्वत:चा असेल तर भारतीय चलनाप्रमाणे ८ लाख रुपये महिना होतो.
अमेरिकेत एका ट्रक ड्रायव्हरची सॅलरी सरासरी ८३३३२ डॉलर म्हणजे ६८ लाख ६६ हजार ४३१ रुपये आहे. महिन्याच्या हिशोबाने ५ लाख रुपये होतात. तर अमेरिकेत कार ड्रायव्हरचा वार्षिक पगार २९२५० रुपये म्हणजे २४ लाख रुपये होतो. जो महिन्याला २ लाख रुपये असतो. भारतात ट्रक ड्रायव्हरचा पगार सरासरी ३०-४० हजार असतो तर कार ड्रायव्हरचा सरासरी २० लाख रुपये आहे.
३) आर्मी
जगात अमेरिकेची आर्मी मजबूत मानली जाते. अमेरिकेत आर्मीतील जवानाची सॅलरी वार्षिक ६६,५२२ डॉलर म्हणजे ५५ लाख आहे. तर याठिकाणी सर्वात कमी पॅकेज ३४,८८१ डॉलर म्हणजे २९ लाख रुपये तर सर्वाधिक १२४१०८ डॉलर म्हणजे १.०२ कोटी इतके आहे. भारतात जवानाची सॅलरी सरासरी ५.०१ लाख तर कमी ३ लाख इतकी आणि सर्वाधिक ११ लाख वार्षिक आहे. भारतात सुरुवातीचा पगार २५ हजार रुपये असतो.
४) डिलीव्हरी बॉय
जगभरात ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. लोक घरात बसून शॉपिंग करत आहेत. डिलीव्हरी बॉयच्या मदतीने घरबसल्या सामान पोहचते. भारतात सरासरी डिलीव्हरी बॉयचा पगार १८ हजार रुपये आहे काही जण तासानुसार काम करतात. या क्षेत्रात सर्वाधिक ४ लाखापर्यंत पगार आहे. तर अमेरिकेत डिलीव्हरी बॉयला सरासरी वार्षिक ३५,४८७ डॉलर म्हणजे २९ लाख रुपये पगार आहे. महिन्याचा हिशोब धरला तर अडीच लाख रुपये होतात. त्याठिकाणी तासाला १८ डॉलर म्हणजे १४८२ रुपये मिळतात.
५) बँकर
अमेरिकेत एका बँकरची सॅलरी सरासरी वार्षिक ५५,८९३ डॉलर म्हणजे ४६ लाख रुपये इतकी आहे. बँकेत काम करणाऱ्या कमीत कमी वार्षिक ५१,२३८ डॉलर आणि सर्वाधिक १३०९९२ डॉलर पगार आहे. याठिकाणी दर महिना ४ लाख रुपये बँक कर्मचारी सॅलरी आहे. तर भारतात एका बँकरचा पगार सर्वात कमी ३२७८० रुपये आहे तर ६ वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो.