मन की बात करायला नाही; तर ऐकायला आलोय; दुबईत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 01:50 PM2019-01-11T13:50:09+5:302019-01-11T13:51:39+5:30
राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर
दुबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल यांनी भारतीय कामगारांशी संवाद साधला. तुम्ही जगभरात भारताचं नाव मोठं करत आहात. तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मला तुमची मन की बात ऐकायची आहे. मला 'मन की' बात करण्यात फारसा रस नाही, अशा शब्दांमध्ये कामगारांशी संवाद साधत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. तुम्हाला जिथे आमची मदत लागेल, तिथे आम्ही तुम्हाला साथ देऊ, असं आश्वासन यावेळी राहुल यांनी दिलं.
राहुल गांधी दुबई विमानतळार पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत झालं. दुबईच्या विमानतळावर राहुल-राहुल अशा घोषणाही ऐकू आल्या. राहुल गांधी दुबईनंतर अबूधाबीला जाणार आहेत. या ठिकाणी ते विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना संबोधित करतील. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोडा या दौऱ्यादरम्यान राहुल यांच्या सोबत आहेत. दुबईत राहुल यांनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली आहे. राहुल गांधींचा हा दौरा राजकीय नसून तो केवळ अनिवासी भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी आहे, अशी माहिती राहुल यांच्या सोबत असलेल्या टीमनं दिली.
दुबई, अबूधाबीतील शहरांमध्ये भारतीय कामगारांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश कामगार दक्षिण भारतातले आहेत. या कामगारांच्या भेटीगाठींशिवाय राहुल गांधी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या इंडो-अरब कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. राहुल गांधी उद्या अबूधाबीला जाणार असून तिथे ते संयुक्त अरब अमिरातच्या मंत्र्यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते इंडियन बिझनेस ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.