लिमा - पेरूच्या राष्ट्राध्यक्ष डायना बोलूर्ते यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य निवासस्थान आणि खासगी घरावरही छापा टाकला आहे. त्यांच्याकडे लक्झरी ब्रँड रोलेक्ससह १४ महागडी घड्याळे असल्याचा आरोप आहे.
राष्ट्राध्यक्ष डायना यांच्या या भ्रष्टाचार घोटाळ्याला ‘रोलेक्स केस’ म्हटले जात आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्ष या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत होते. यानंतर पोलिसांनी यात गुन्हा नोंदवत त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले.
डायना यांच्या घराच्या झडतीसाठी पोलिस पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दरवाजा उघडला नाही. यानंतर तो तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. राष्ट्राध्यक्ष डायना आरोपांवर म्हणाल्या की, माझ्याकडे जे काही आहे, ते मी मेहनतीने कमावले आहे. मी जेव्हा या पदावर आले तेव्हा माझे हात स्वच्छ होते आणि जेव्हा मी येथून जाईन तेव्हाही माझे हात स्वच्छ राहतील. मी हे वचन देशातील जनतेला दिले होते.