वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आलिशान खासगी क्लब व रिसॉर्ट मार-ए-लागो इस्टेटवर एफबीआयने छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी तिजोरी फोडून गोपनीय कागदपत्रे व राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.या कारवाईमुळे ट्रम्प संतप्त झाले असून, २०२४ मध्ये आपल्याला व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापासून याद्वारे अडथळे आणले जात आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडताना जे १५ पेट्यांमधील दस्तावेज आपल्या बरोबर नेले होते, त्याच्याशी संबंधित एफबीआयने झडती घेतली. यात काही राष्ट्रीय अभिलेखागाराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आहेत. माझ्या घरातील तिजोरी फोडली. यात व वॉटरगेटमध्ये काय फरक आहे?, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर आपल्या फ्लोरिडामधील घरी काही गोपनीय कागदपत्रे दडवली आहेत का, याचा अमेरिकेचे न्याय मंत्रालय शोध घेत आहे. अमेरिकी संसदेवर ६ जानेवारी रोजी हल्ला करणाऱ्या गर्दीला कथितरित्या चिथावणी दिल्याच्या अन्य प्रकरणातही ट्रम्प चौकशीचा सामना करीत आहेत.
टॉयलेटमध्ये फ्लश करत होते कागदपत्रे
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्यावर अतिशय महत्त्वाची कागदपत्रे फाडल्याचा आणि टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचा आरोप करण्यात आला होता. ट्रम्प यांनी इतके पेपर फ्लश केले की, त्यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेट जाम झाले होते. माजी राष्ट्राध्यक्षांच्या कागदपत्रे फाडण्याच्या या सवयीची इतर बाबींबरोबरच चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हॅबरमॅनने ‘कॉन्फिडन्स मॅन’ या पुस्तकात या प्रकरणाची माहिती दिली आहे.
हे प्रकार गरीब आणि विकसनशील देशांतच ७६ वर्षीय ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, असे प्रकार केवळ तिसऱ्या जगातील म्हणजेच गरीब व विकसनशील देशांमध्येच होऊ शकतात.