बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वेअपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकापासून सुमारे ८० किमी अंतरावर एक पॅसेंजर ट्रेन मालगाडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
स्थानिक पोलीस अधिकारी सिराजूल इस्लाम यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी मृतांचा आकडा २० च्या वर गेल्याचा दावा केला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, भीषण रेल्वे अपघातानंतर अग्निशमन सेवा कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. तसेच बचाव अभियान सुरू आहे. भैरब रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद आलिम हुसेन शिकदर यांनी सांगितले की, ढाका येथे जाणारी पॅसेंजर ट्रेन ईगारोसिंदूर एक्स्प्रेस गोधुली आणि किशोरगंज येथे जाणारी मालगाडी यांच्यात आज दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात भैरब रेल्वे स्टेशनच्याजवळ झाला.
दरम्यान, अशाच प्रकारचा भीषण रेल्वे अपघात यावर्षी जून महिन्यात भारतातील ओदिशामध्ये झाला होता. त्या भीषण अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता.