ग्रीसमध्ये मंगळवारी रात्री दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. एक पॅसेंजर ट्रेन आणि दुसऱ्या मालगाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दोन्हीही गाड्यात वेगात असल्याने चक्क भूकंपाचा हादरा बसला की काय, असा आवाज परिसरातील आला होता. या भीषण दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक जखमी आहेत. ग्रीसमधील टेम्पे येथे ही दुर्घटना घडली असून संबंधित प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळी धाव घेतली.
दोन रेल्वे गाड्यांची धडक बसल्याने काही डबे रेल्वे रुळावरुन खाली घसरले तर रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली होती. येथील थिसली राज्याचे गवर्नर कॉन्स्टेंटिनोस एगोरास्टोस यांनी स्थानिक मीडिया स्काई टीव्हीशी बोलताना सांगितले की, ही धडक अतिशय जोरदार होती, या अपघातात प्रवासी ट्रेनचे पहले चार डब्बे रुळावरुन खाली उतरले होता. या दुर्घटनेतील जवळपास २५० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, स्थानिक मीडिया एजन्सींच्या रिपोर्टनुसार, ट्रेनमधून जवळपास ३५० लोक प्रवास करत होते. रात्रीच्या वेळेस ही दुर्घटना घडल्यामुळे मदत व बचावकार्यास अडथळा येत होता. मात्र, संबंधित यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करत २५० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. तर, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओतून या अपघाताची दाहकता दिसून येते. तर, अपघाताची टक्कर झाल्यानंतर आलेल्या आवाजाने भूंकपाचा भास झाल्याचंही काही स्थानिकांनी म्हटलंय.