बीजिंग : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी पाऊस पाडू शकणारे ‘क्लाउड सीडिंग’ हे तंत्रज्ञान देण्यासाठी, तसेच स्थानिक हवामान विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी चीन भारतासोबत चर्चा करीत आहे.बीजिंग, शांघाय आणि चीनमधील पूर्व अन्हुई प्रांतातील वैज्ञानिकांनी आणि अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचा अलीकडेच दौरा केला होता, त्यात हे तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती. महाराष्ट्र गेल्या २ वर्षांपासून भयंकर दुष्काळाचा मुकाबला करीत आहे. या पार्श्वभूमीवर चीनने ही तयारी दर्शवली आहे. चीन गेल्या कित्येक वर्षांपासून ‘क्लाउड सीडिंग’ रॉकेटचा वापर करतो. त्यात पाऊस पाडणारा सिल्व्हर आयोडाइड असतो, पण पावसासाठी ढगांची गरज असते.सरकारचे नियंत्रण असणाऱ्या ‘चायना डेली’ने अधिकाऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, भारत सरकारसोबत याबाबतची चर्चा सफल झाली, तर चिनी तज्ज्ञ भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना आधुनिक क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देतील. त्यात पुढे म्हटले आहे की, २०१७ च्या मोसमात महाराष्ट्रातील सर्वात भयंकर दुष्काळ असलेल्या मराठवाडा या भागात असा पाऊस पाडता येईल. याबाबत मेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चीनचे एक वरिष्ठ अधिकारी हान झेंग यांची चर्चा झाली होती. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी चीन कुठली मदत करू शकतो का? असा प्रश्न हान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी अनुकूल प्रतिसाद दिला होता. (वृत्तसंस्था)सर्वांत आधुनिक तंत्रज्ञान चीनकडेच1958पासून चीनने ‘क्लाउड सीडिंग’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. आज या क्षेत्रातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान चीनकडे उपलब्ध आहे.
पाऊसही आता ‘मेड इन चायना’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 4:57 AM