वॉशिंग्टन : पावसाचे पाणी भारतीय नागरिकांसाठी एक वरदान आहे. हे पाणी वाचवून भाज्यांच्या रोपांना घातल्यास विजेचे बिल कमी होते, कॅलरीजयुक्त आहार मिळतो, एवढेच नाही तर पाऊस भारतीयांसाठी उत्पन्नाचे एक स्रोत बनू शकतो, असा नव्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. नासाच्या पर्जन्यविषयक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. नासाची पर्जन्यविषयक मापन मोहीम व जपानच्या अंतराळ संस्थेच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला असून, अर्बन वॉटर जर्नलमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. १९९७ ते २०१५ यादरम्यान विविध प्रदेश व उपप्रदेशात झालेल्या पावसाच्या पाहणीवर हे निष्कर्ष काढण्यात आले. भारतात सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे ही कठीण बाब आहे. हे पाणी छोट्या टाकीत साठवून ठेवल्यास पिण्यासाठी चांगले पाणी मिळू शकते, असे या संशोधनाचे प्रमुख डॅन स्टाऊट यांनी म्हटले आहे. डॅन स्टाऊट हे उटाह विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंग खात्याचे सहायक संशोधक असून त्यांच्यासह तीन संशोधकांनी हे संशोधन केले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग ही कल्पना नवी नाही; पण अजूनही भारतात तिचा फारसा उपयोग होत नाही. पावसाचे पाणी साठवणे वा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे हा भारताच्या पाणी समस्येवरील मोठा उपाय आहे. भारतात जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवले जाते. त्यामुळे तात्काळ वापरासाठी हे पाणी उपलब्ध होत नाही. याऐवजी भारतीय नागरिकांनी २०० गॅलनच्या टाकीत पावसाचे पाणी साठवले, तर ते त्यांना सहज वापरता येईल. दाट लोकसंख्या असणाऱ्या शहरी भागातही हा प्रयोग यशस्वी होईल. भारतातील वाढत्या शहरांना या पद्धतीने पाणी पुरवणे सहज शक्य होईल. स्टाऊट यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या बहुतांश भागात पावसाचे पाणी साठविले जात नाही. जिथे ते साठवले जाते, तिथे कड्या कुलुपे लावून बंद ठेवण्यात येते. देशाच्या काही भागात सरासरी पाणी साठवले जाते; पण तेवढे पुरेसे नाही. (वृत्तसंस्था)
पावसाच्या पाण्याने होईल भारतीयांची बचत
By admin | Published: June 26, 2015 11:41 PM