ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 3 - सार्क देशांच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. उद्या सार्क देशांच्या गृहमंत्र्यांची परीषद होणार असून यामध्ये राजनाथ सिंह दाऊद इब्राहिम व आंतरराष्ट्रीय सीमांवरील दहशतवाद हे विषय चर्चेसाठी मांडतील अशी शक्यता आहे.
राजनाथ सिंह यांची ही पहिलीच पाकिस्तान भेट आहे. दक्षिण आशियाई देशांशी सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यावर राजनाथ भर देतील अशी अपेक्षा आहे. दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी या संदर्भात सार्क देशांच्या बेठकीत अर्थपूर्ण चर्चा होईल अशी अपेक्षा दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी व्यक्त केली आहे. लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफीज सईद याने राजनाथ यांना पाकिस्तानात येऊ देऊ नये अन्यथा देशभर निदर्शने करण्यात येतील असा इशारा दिला होता.
भारताचे गृहसचिव राजीव महर्षी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व करत असून ते कालच इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत.
जम्मू व काश्मिरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीच्या खात्म्यानंतर काश्मिरमध्ये उद्भवलेल्या स्थितीबाबतही राजनाथ पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्याशी चर्चा करतील अशी एक शक्यता आहे. या घटनेनंतर भारत व पाकिस्तानचे संबंध बिघडले असून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी शक्यता आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केवळ वनीची प्रशंसाच केली नव्हती तर एक दिवस काश्मिर पाकिस्तानचा भाग असेल असेही म्हटले होते. तर जगाच्या अंतापर्यंत शरीफ यांचे हे स्वप्न सत्यात उतरणार नाही असा जवाब परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला होता. यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहेत.
दहशतवादाखेरीज व्हिसा मिळण्याच्या अटी शिथिल करणे, ड्रग्जची वाहतूक आदी विषयांवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे.