नवी दिल्ली - भारतापाठोपाठ आता चीननंही रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर म्यानमारला आपलं समर्थन दर्शवले आहे. भारताने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नजरेसमोर ठेऊन आपली भूमिका मांडली तर चीनला आपला व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. रोहिंग्यांच्या मुद्यावर म्यानमारला समर्थन देणा-या चीनला, रोहिंग्या ही एक जागतिक समस्या होऊ नये, असे वाटत आहे. दरम्यान, म्यानमारला समर्थन देण्यामागे चीनचा स्वतःचा व्यावसायिक हेतू आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारमधील हिंसाचारग्रस्त राखीन प्रांतात चीननं पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांवर जवळपास 7.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. याच राखीन प्रांतात सर्वाधिक हिंसा सुरू आहे. ऑगस्टमध्ये या प्रांतातील हिंसाचारात वाढ झाल्यानं मोठ्या संख्येनं रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारील देश बांगलादेशात पलायन केले.
दरम्यान, सिंगापूर येथील राजारथनम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज (RSIS) मधील चायनीज प्रोग्रॅमचे असोसिएट रिसर्च फेलो आयरिनी चेन यांनी सांगितले की, चीन राखीन प्रांतात जवळपास 7.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. या प्रांतात एक औद्योगिक पार्क आणि स्पेशल इकोनॉमिक झोनदेखील विकसित करण्याची चीनची योजना आहे. या पार्श्वभूमीवर चीनसाठी ही गुंतवणूक मानवी समस्यांहून अधिक महत्त्वाची आहे.
राखीनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारच्या राखीन राज्यातील ‘दहशतवाद्यांचा हिंसाचार’ काळजी करण्यासारखा असल्याची म्यानमारची चिंता योग्य असल्याचे भारताने म्हटले आहे. म्यानमारचे ऐक्य आणि भौगोलिक एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या प्रमुख आँग सान सू की यांच्याशी म्यानमार दौ-यादरम्यान बोलताना केले होते.
रोहिंग्यांचा प्रश्न नक्की आहे तरी काय ? 2012 साली एका बलात्काराच्या प्रकरणानंतर रोहिंग्यांच्या विरुद्ध राखीन आणि बौद्ध समुदाय असा तणाव नव्याने निर्माण झाला. रोहिंग्या आमच्या देशात बाहेरून आले आहेत. त्यांचा आमच्या देशाला धोका आहे. ते आपली लोकसंख्या वाढवून आमचा पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशिया- इंडोनेशिया सारखा देश करुन टाकतील, अशी भीती म्यानमारचे लोक आणि कट्टर उग्रवादाचे समर्थन करणारे धर्मगुरु उघडपणे बोलू लागले. त्यानंतर झालेल्या जाळपोळ, बलात्कार, गोळीबार आणि हत्येच्या सत्रामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 1 लाख चाळीस हजार रोहिंग्यांनी बांगलादेश सोडला आहे. काही रोहिंग्यांनी अन्नपाण्याविना साध्या लाकडी बोटींतून मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया गाठले. जे जिवंत किनाऱ्याला लागले ते बेकायदेशीररित्या जीव मुठीत धरून आग्नेय आशियामध्ये कसेबसे राहात आहेत. 1990 पासून 4 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात राहण्याचा पर्याय निवडून तिकडे पलायन केले आहे. आजही ते सत्र सुरूच आहे.