Ram Mandir Ayodhya: आज ना भुतो ना भविष्यती असा सोहळा देशवासियांना अनुभवायला मिळाला. अनेक शतकांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाले. जगभरात या सोहळ्याची चर्चा होत आहे. आजच्या सोहळ्याबद्दल अख्खे जग भारताचे कौतुक करत आहे. पण, पाकिस्तान हा एकमेव देश आहे, जो आजच्या सोहळ्याविरोधात गरळ ओकतोय. अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर पाकिस्तानने लाजिरवाणी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानने अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, हे भारताच्या वाढत्या बहुसंख्यवादाचे लक्षण आहे. कट्टरतावाद्यांनी बाबरी मशीद पाडली होती. दुर्दैवाने, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना केवळ निर्दोष सोडले नाही, तर पाडलेल्या मशिदीच्या जागी मंदिर बांधण्यासही परवानगी दिली.
भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्नपाकिस्तानने भारतीय मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने या निवेदनात पुढे म्हटले की, हा कार्यक्रम भारतीय मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या उपेक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही इदगाह मशिदीसह मशिदींची यादी वाढत आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे.