मॉस्को : रशियात एका माथेफिरूने शाळेत बेछूट गोळीबार करून नऊ बालकांसह १५ जणांना ठार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या हल्ल्यात २३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उदमूर्तिया प्रांताची राजधानी इझेवस्क येथे ही घटना घडली. हे शहर मॉस्कोपासून ९६० किलोमीटरवर आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून आर्टिओम काझांतसेव्ह (वय ३४) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तो याच शाळेत शिकलेला आहे.
हल्लेखोर काळ्या रंगाचा टी शर्ट घालून शाळेत आला होता. त्यावर नाझी प्रतिके होती. हल्ल्यामागील त्याच्या हेतूविषयी काहीही सांगण्यात आले नाही. एका मानसोपचार केंद्रात रुग्ण म्हणून त्याने नोंदणी केली होती, असे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचालोव्ह यांनी सांगितले.
जखमींमध्ये २० बालकांचा समावेश आहे, असेे ते म्हणाले. क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेसकोव्ह यांनी ही घटना दहशतवादी कृत्य असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संबंधित प्रशासनाला आवश्यक ते आदेश दिले आहेत. पुतीन यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे, असेही ते म्हणाले. या शाळेत इयत्ता पहिली ते ११ वीपर्यंतचे वर्ग आहेत. हल्ल्यानंतर शाळा रिकामी करून आसपासचा परिसर सील करण्यात आला.