ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १८ - भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने (रिसर्च अँड एनेलिसीस विंग) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पाकिस्तानमधील पंजाब प्राांतातील सरकारने केला आहे. शरीफ यांच्यासोबत जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदच्या हत्येचा कटही भारताने रचल्याचा दावा स्थानिक सरकारने केला आहे.
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील गृहमंत्रालयाने ९ ऑक्टोबररोजी पाक सरकारला एक पत्रक पाठवले होते. यामध्ये रॉच्या कटाविषयी माहिती देण्यात आली होती. रॉने पाकिस्तानमधील अशांती निर्माण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला आहे असा दावा पत्रकात करण्यात आला आहे. रॉ़ने सूत्रांकडून हाफिज सईदच्या संभावित ठिकाणांची यादी तयार केली असून यासंदर्भार पाक सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या दहशतवादविरोधी मोहीमेमुळे पाकमधील स्थिती सुधारत असून आता बरेच देश पाकमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. पण भारतातील भाजपा सरकारला हे सहन होत नाहीये असे कांगावाही यात करण्यात आला आहे.