वॉशिंग्टन : रात्रीच्या गस्तीवर असताना तेरा महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आलेल्या अमेरिकेतील एका पोलीस अधिकाऱ्याला २६३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुवारी वयाची २९ वर्षे पूर्ण करणाऱ्या डॅनिएल हॉल्तझ्क्लॉ हा ओक्लाहोमात पोलीस अधिकारी होता. गणवेशधारी या आरोपीला बलात्काराच्या १८ प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले असून, पीडितांमध्ये किशोरवीयन मुली आणि कृष्णवर्णीय महिलांचा समावेश आहे. १८ आरोपांतून कोर्टाने त्याची सुटका केली असली, तरी त्याला २६३ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. बलात्काराच्या चार प्रकरणांत त्याला प्रत्येकी ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच बळजोरी, अश्लील वर्तन, लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालीही त्याला वेगळी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ पुरुष आणि चार महिलांचा समावेश असलेल्या न्यायपीठाने सलग चार दिवस निकालाचे वाचन केले. दोष सिद्ध झाल्याने कोर्टाने अखेर त्याला शिक्षा ठोठावत पीडितांना न्याय दिला. कोर्टाचा फैसला ऐकताच डॅनिएल हॉल्तझ्क्लॉ कोर्टातच ढसाढसा रडला, तर सर्वात कमी वयाच्या पीडितेच्या आईने टाळ्या वाजवून कोर्टाच्या निर्णयाला दाद दिली. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून २१ जानेवारीपासून त्याची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. डॅनिएल हॉल्तझ्क्लॉ हा गस्तीवर असताना येणाऱ्या-जाणाऱ्यांची आणि वाहनांची तपासणी करायचा. अटकेची भीती दाखवून शरीर सुखाची मागणी करायचा. निर्णयाचे वाचन चालू असताना त्यावेळी डॅनिएल हॉल्तझ्क्लॉचे आई-वडील आणि त्याची बहीण कोर्टात हजर होती.
बलात्कार : पोलिसाला २६३ वर्षे कैद
By admin | Published: December 11, 2015 11:32 PM