नवी दिल्ली : तालिबाननेअफगाणिस्तानची सत्ता काबीज करून आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अफगाणिस्तानाततालिबान दररोज नवनवीन फर्मान काढत आहे. अशातच तालिबानने आणखी एक फर्मान काढले आणि सर्वत्र चर्चा रंगली. तालिबानच्या नव्या आदेशानुसार अफगाण मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या पत्रानुसार तालिबानने अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांसाठी चालवली जाणारी विद्यापीठे बंद करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, तालिबानने घेतलेल्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने नाराजी व्यक्त केली आहे. राशिद खानने ट्विटच्या माध्यमातून 'अफगाणिस्तानच्या मुलींना शिकू द्या' अशा शब्दांत आवाज उठवला आहे. खरं तर मंगळवारी उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांचे शिक्षण स्थगित करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आले आहे.
3 महिन्यांपूर्वी झाली होती ॲडमिशन टेस्ट दरम्यान, 3 महिन्यांपूर्वीच संपूर्ण अफगाणिस्तानातील हजारो मुलींनी विद्यापीठांमध्ये आयोजित केलेली ॲडमिशन टेस्ट दिली होती. त्यानंतर लगेचच हा आदेश आला. या नव्या आदेशानंतर अफगाणिस्तानातील हजारो मुलींचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने महिला आणि मुलींच्या शिक्षणाबाबत फर्मान काढले होते. यामध्ये महिला व मुलींना पुरुषांच्या शाळेत शिकता येणार नाही, असे सांगण्यात आले. यासोबतच मुलींना केवळ महिला शिक्षिकाच शिकवू शकतील. तसेच तालिबान सरकारने महिलांना जिममध्ये जाण्यास बंदी घातली होती. एक वर्षापूर्वी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून हा हुकूम महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे. तालिबानच्या आदेशाबाबत महिलांनीही अनेकवेळा निषेध देखील नोंदवला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"