वॉशिंग्टन: काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. भारत, पाकिस्तान राजी असल्यास मी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करेन, असं ट्रम्प म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी अमेरिकेत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा. दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा, असं ट्रम्प म्हणाले. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे इम्रान खान यांचा जळफळाट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं विशेषत: अमेरिकेनं यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी खान यांची मागणी आहे. मात्र काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्यानं तिसऱ्या देशानं यात लक्ष घालू नये, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली आहे.
भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 5:44 AM