रशियात मार्शल लॉ लागू करण्याची तयारी? पुतीन २० लाख लोकांची सैन्यात भरती करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:50 PM2022-11-25T23:50:25+5:302022-11-25T23:50:45+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोसह महत्वाच्या शहरांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या तयारीत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोसह महत्वाच्या शहरांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या तयारीत आहेत. या कायद्याद्वारे २० लाख लोकांची सैन्यात भरती केली जाणार आहे. युक्रेन युद्धात रशियाचा ओसरत चाललेला प्रभाव पुन्हा मिळविण्यासाठी पुतीन हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामध्ये ३ लाख महिलांची भरती केली जाणार आहे. पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. पुतीन यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही सैन्य भरतीच्या आदेशांवर सही केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
डेली मेलनुसार पेसकोव यांनी सांगितले की, पुतीन त्यांच्या संबोधनात ज्या घोषणा करतील असे सांगितले जात आहे त्यात ती नाहीय. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला आव्हान देताना सांगितले की, कायमस्वरुपी तोडग्यासाठी रशियाने आमचे ताब्यात घेतलेले भूभागातून ताबडतोब सैन्य माघारी घ्यावे.
काही दिवसांपूर्वीच पुतीन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत बातम्या आल्या होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते राष्ट्राध्यक्ष पद सोडू शकतात, असेही बोलले जात आहे. जनरल एसव्हीआर टेलिग्राम चॅनलवर पुतीन २० लाख लोकांची भरती करणार असल्याचे म्हटले आहे. मार्शल लॉ लागू करण्याच्या अनुषंगाने एकत्रीकरणाची योजना आखण्यात आली आहे, असे निरीक्षक व्हॅलेरी सोलोव्हियोव्ह यांनी म्हटले आहे.