नवी दिल्ली – जगावरील कोरोनाचं संकट कमी होत नाही तोवर या व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron) अनेक देशाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या व्हेरिएंटमुळं जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. इटलीच्या रिसर्चर्सने कोविड १९ ओमायक्रॉन व्हेरिएंट व्हायरसचा पहिला फोटो जारी केला आहे. यातून या व्हेरिएंटची घातकता लक्षात येते. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आहे.
कोरोनाविरुद्ध लढाईसाठी वैज्ञानिकांनी मेहनत घेत लस विकसित केली मात्र अनेकजण याबाबत गैरसमज निर्माण करतात. सरकारने जागरुकता केली तरी अनेकांनी लस घेतली नाही. अशावेळी एका व्यक्तीला बेजबाबदारपणा इतका नडला की त्याला जीव गमवावा लागला. अखेरच्या दिवसात त्याने लस देण्यासाठी विनवणी केली परंतु तो कोरोना संक्रमित असल्याने त्याला लस देणं शक्य नव्हतं.
...म्हणून लस घेतली नाही
ब्रिटनमधील ५४ वर्षीय ग्लिन स्टील नावाच्या व्यक्तीने कोरोना लस घेण्यापासून नकार दिला. ग्लिनने यामागे तर्क लावला की, लसीची चाचणी प्राण्यांवर झाली आहे. त्यामुळे ही शाकाहारी असू शकत नाही. त्यामुळेच त्याने कोरोना लस घेण्यापासून नकार दिला. नोव्हेंबरमध्ये ग्लिन स्टील कोरोना संक्रमित झाला. लस न घेतल्याने त्याची अवस्था खूप गंभीर झाली होती. अखेर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. परंतु डॉक्टरांनाही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत.
अखेरच्या क्षणी जाणीव झाली
ग्लिन स्टीलची पत्नी एम्माच्या सांगण्यानुसार, १६ नोव्हेंबरला वॉर्सेस्टशायर रॉयल हॉस्पिटलमध्ये मृत्यूपूर्वी ग्लिन वारंवार म्हणत होते काश मी लस घेतली असती. अखेरच्या क्षणी ग्लिन स्टीलला लस घेण्याची जाणीव झाली. परंतु वेळ निघून गेली होती. मी कधीही इतका त्रास सहन केला नाही. काश मी लस घेतली असती हे त्यांचे अखेरचे शब्द होते. ग्लिन स्टील यांच्या पत्नी एम्मा यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु त्यांनी पती ग्लिन स्टील यांना खूप समजावलं तरीही त्यांनी लस घेतली नाही. पतीच्या मृत्यूनंतर एम्मा प्रत्येक व्यक्तीला लस घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. जर लस घेतली असती तर ग्लिन स्टील जिवंत असले असं एम्मा यांनी म्हटलं आहे.